मोदींनी विश्वास गमावला

 
  • मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ आकर्षक घोषणा करण्यात मग्न असून, अल्पावधीतच त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारने जनतेची विश्वासार्हता गमावली आहे. केवळ इव्हेंट साजरे करून देशाचा विकास होत नाही, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी येथे केली.
    राहुल गांधी यांच्या दोन दिवसीय मुंबई दौऱ्याला शुक्रवारपासून सुरुवात झाली. आज सकाळी मालाडमध्ये काँग्रेस
    कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. या वेळी त्यांनी मोदी सरकारवर टीकेचे आसूड ओढले. राहुल यांच्या आक्रमक भाषणाने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता.
    राहुल म्हणाले, मोदी चांगले इव्हेंट मॅनेजर आहेत. ते स्मार्ट सिटीची भाषा करतात, पण हजारो कोटींचे बजेट असलेल्या मुंबईसाठी अवघ्या १०० कोटींची तरतूद करतात. खरेतर ही शुद्ध फसवणूक आहे. आम्ही सत्तेत असताना नांदेडसारख्या शहराच्या विकासासाठी २ हजार कोटी रुपये दिल्याची आठवणही त्यांनी करून दिली.
    स्टार्ट अप योजनेवर ते म्हणाले, गरीब आणि श्रीमंतातील दरी मिटवण्याची गरज आहे. स्टार्ट अप इंडिया आणि कनेक्ट इंडिया या योजना नवे उद्योजक घडविण्यासाठी चांगल्या आहेत. पण देशात गरिबांची संख्याही मोठी आहे. मुंबईसारख्या महानगरात कामगार, फेरीवाले, छोटे व्यावसायिक आहेत, त्यांच्यासाठी काय करणार, असा सवाल त्यांनी केला. केवळ इव्हेंट्सचे आयोजन करून आणि भाषणे देऊन स्वच्छ भारत अभियान यशस्वी होणार नाही, असा टोलाही त्यांनी लागवला. 
    ‘मतभेद विसरून कामाला लागा’
    काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांनी आपसांतील मतभेद विसरून कामाला लागण्याचे आवाहन राहुल गांधी यांनी केले. कार्यकर्त्यांच्या जोरावरच काँग्रेस पुन्हा सत्तेत विराजमान होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मुंबईचा खऱ्या अर्थाने विकास करायचा झाल्यास मुंबईत काँग्रेसचा महापौर असावा, असे म्हणत पालिका निवडणुकीच्या प्रचाराचेच जणू रणशिंग त्यांनी फुंकले.
    आम्ही आगामी काळात मुंबईत, त्यापाठोपाठ राज्यात आणि नंतर केंद्रात सत्ता मिळवू, असे म्हणताच जमलेल्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. या वेळी प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, गुरुदास कामत यांच्यासह पक्षातील ज्येष्ठ नेते मंडळी उपस्थित होती.
    शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले
    शेतकऱ्यांची स्थिती दिवसेंदिवस अत्यंत बिकट होत असून, सरकारचे त्यांच्याकडे लक्ष नाही. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मोदी सरकार काहीही पावले उचलत नसल्याची टीका राहुल यांनी केली. मुंबईत फेरीवाल्यांना व्यवसायासाठी हक्काची जागा मिळवून देण्यासाठी काँग्रेस मोठे आंदोलन उभारणार असल्याची घोषणाही त्यांनी या वेळी केली.
    ‘तीळगूळ घ्या, गोड बोला!’
    राजकारणात संघर्ष, मतभेद होतच राहतात. काँग्रेस लोकशाही मार्गाने चालणारा पक्ष असल्याने थोडेफार पुढेमागे आपल्याकडे चालते. धाक दाखवून गप्प बसवायला हा काही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाही.
    मात्र, राजकारणात यशस्वी व्हायचे असेल तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांसह सर्वांना सोबत घेऊनच पुढे जावे लागेल, असे सांगत ‘तीळगूळ घ्या आणि गोड गोड बोला’ हा मकरसंक्रांतीचा संदेशही त्यांनी पक्षनेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिला.