गरम भांड्यात पडून पाच वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू



पिंपरी-चिंचवड: गावातील गाथा पारायण सप्ताहानिमित्त तयार करण्यात आलेल्या स्वयंपाकाच्या गरम भांड्यात पडल्याने एका चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे गावच्या शिंदेवाडी येथे घडली आहे.

गरम भांड्यात पडून पाच वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
प्राजक्ता मराठे असे मृत्यू झालेल्या पाच वर्षीय चिमुकलीचे नाव आहे. नवलाख उंब्रे येथील शिंदेवाडी या ठिकाणी संत तुकाराम महाराज गाथा पारायण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहानिमित्त आलेल्या भाविकांसाठी स्वयंपाक करण्यात येत होता. प्राजक्ता ही काल दुपारी त्या ठिकाणी खेळत होती. यावेळी खेळताना तोल जाऊन ती जवळच असलेल्या वरणाच्या गरम कढईमध्ये पडली. यामध्ये ती 80 टक्के भाजली.

प्राजक्ताला तातडीने भोसरी येथील बर्न हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान रात्री उशिरा तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे मावळ तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.