पठाणकोट हवाई तळावर दहशतवाद्यांकडून पुन्हा गोळीबार सुरू

2 जानेवारी : नववर्षाचं स्वागत होत असतांना दहशतवाद्यांनी पहिल्याच दिवशी डोकंवर काढलंय. पंजाबमधल्या पठाणकोट एअरफोस स्टेशनवर दहशतवाद्यांनी मध्यरात्री हल्ला चढवत बेछुट गोळीबार केलाय. भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर देत चार दहशतवाद्यांनी यमसदनी धाडलं. पण पुन्हा एकदा गोळीबार सुरू झाला असून दोन दहशतवादी आत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरू आहे. एअरफोस स्टेशनमधून स्फोटाचे आवाज येताहेत. सेनेच्या हेलिकॉप्टरवर गोळीबार करण्यात आला.
शुक्रवारी मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास लष्करी वेशात आलेल्या काही दहशतवाद्यांनी विमानतळावर बेछूट गोळीबार केला. पाच तासांच्या चकमकीनंतर चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानाना यश आले आहे. दहशतावादी आणि सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीत तीन जवान शहीद झाले आहे.
विमानतळावर काल रात्री पंजाबचे पोलीस अधिक्षक सलविंदर सिंग यांचे काही दहशतवाद्यांनी त्यांच्या गाडीसह अपहरण केले होते त्यावेळीच पंजाबसह काश्मिरमध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला होता. घटनेनंतर पंजाबमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर दिल्लीत दाखल झाले आहे. त्यांनी सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी तत्काळ बैठक बोलवली आहे.राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोबल पंतप्रधानांना भेटून याचा संपूर्ण रिपोर्ट देणार आहेत.