वर्ध्याची पहिली हवाई सुंदरी बनली प्रियंका सातपुते...... प्रेरणादायी संघर्ष

14 जानेवारी 2016
        वर्धा - सुरुवातीला ग्राउंड स्टाफ म्हणून काम करणारी प्रियंका आता त्याच इंडिगो एअर लाइन्समध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करीत "हवाई सुंदरी‘ म्हणून रुजू होत आहे.  सहा वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाले. आईने मुलींच्या पाठीशी उभे राहत घेतलेल्या परिश्रमाचे चीज करीत प्रियंकाने हवाई सुंदरी होण्याचे स्वप्न साकारले. बोरगाव (मेघे) येथील प्रियंका वि. सातपुते (वय 23) या तरुणीचा संघर्ष प्रेरणादायी आहे.

         प्रियंकाचे वडील विजयराव रामाजी सातपुते हे आयटीआयमध्ये शिक्षक होते. त्या व्यतिरिक्त समाजप्रबोधनाचे कार्यक्रम करणे, भजन-कीर्तनाची त्यांना आवड होती. पण किडनीच्या विकारामुळे 2009 मध्ये त्यांचे निधन झाले. प्रियंकाने येथील यशवंत महाविद्यालयातून बी.ए.चे शिक्षण पूर्ण केले. हवाई सुंदरी बनू इच्छिणाऱ्या युवतींकरिता "फ्रंकफीम‘तर्फे नागपुरात 18 महिन्यांचे प्रशिक्षण होते. याकरिता निवड होऊन प्रियंकाने हे प्रशिक्षण पूर्ण केले. यानंतर पुणे येथे एअरपोर्टवर एक वर्ष नोकरी केली. पण हवाई सुंदरी होण्याचे स्वप्न तिला पूर्ण करायचे होते. ती गप्प बसली नाही. तिचे प्रयत्न सुरूच होते. 
प्रियंकाने ऑनलाइन सर्च करून हवाई सुंदरीकरिता फॉर्म भरला. चार फेऱ्यांअंती तिची निवड झाली. मुलाखत, समूहचर्चा, ऍप्टिट्यूड एक्‍झाम आणि वैद्यकीय चाचणी या फेऱ्या पार करीत तिने लक्ष्याला गवसणी घातली.