सोलापूर जिल्ह्याचे आमदार बनले ‘प्रशांतराव’ गुलालाने न्हाऊन निघाली पंढरी नगरी... कार्यकर्त्यांमध्ये संचारले नवचैतन्य

पंढरपूर लाईव्ह (प्रतिनिधी):- 

अखेर प्रतीक्षा संपली... प्रत्येक परिचारक समर्थकाला ज्या क्षणाची उत्कंठा लागुन राहिलेली होती तो क्षण आला... सोलापूर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सोलापूर जिल्हा दुधसंघाचे अध्यक्ष प्रशांतराव परिचारक यांनी मोठे मताधिक्य मिळवित दणदणीत यश संपादन केले. पंढरीत त्यांच्या विजयाची  वार्ता समजताच अवघी पंढरी फटाक्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेली. पंढरीचा आसमंत गुलालाने माखला गेला.
बर्‍याच वर्षानंतर या विजयाच्या निमित्ताने संपुर्ण सोलापूर जिल्ह्यातून पंढरीत मोठ्या संख्येने आलेल्या परिचारक गटाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष साजरा केला. ‘एकच झलक...प्रशांतमालक’ च्या जयघोषाने आमदार प्रशांतराव परिचारक यांचे पंढरीत जोरदार स्वागत झाले. प्रशांतराव आपल्या विजयाबद्दल बोलताना म्हणाले की, ‘‘मला जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील ‘देव’ पावले! कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा आणि आमच्या हितचिंतकांच्या सदिच्छांमुळेच हे यश मिळाले आहे. माझा हा विजय मी रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो! हा विजय संयमाने घ्या. यापुढील काळात आपणास मिळून जनहितास्तव बरीच कामे करायची आहेत. 


पंढरपूर (प्रतिनिधी):-  अत्यंत प्रतिष्ठेच्या सोलापूर विधानपरिषद मतदारसंघात भाजप-सेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार प्रशांत परिचारक यांनी राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दीपक साळुंखे यांचा दणदणीत पराभव केला. परिचारक यांना 261 मते मिळाली तर साळुंखे यांना अवघ्या 120 मतांवर समाधान मानावे लागले. परिचारक तब्बल 141 मताधिक्यांनी विजयी झाले आहेत. महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिकांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असतानाही दीपक साळुंखे यांची विधानपरिषदेत दुसर्‍यांदा जाण्याची संधी हुकली.

सोलापूर जिल्हा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून प्रशांत परिचारक आणि दीपक साळुंखे यांच्यात सरळ लढत झाली. दोनच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. लाखोंवर मतांची बोली झाली. त्यामुळे कोण येणार याच्या पैजा लागल्या होत्या. एकूण 398 पैकी 396 मतदारांनी मतदान केले. बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणुकीची मतमोजणी सुरू करण्यात आली. यामध्ये परिचारक यांना 261, दीपक साळुंखे यांना 120 मते मिळाली. तब्बल 15 मते बाद ठरविण्यात आली. परिचारक यांना साळुंखे यांच्यापेक्षा 141 मते अधिक असल्यामुळे ते निवडून आल्याचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी जाहीर केले. मतमोजणी प्रक्रियेला सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. सुरुवातीला 11 मतदान केंद्रांवरील मतपत्रिका एकत्र मिसळण्यात आल्या. यामुळे कोणत्या मतदान केंद्रावरुन कोणाला किती मते मिळाली, हे समजू शकले नाही.

अत्यंत चुरशीची लढाई असल्यामुळे दोन्ही उमेदवारांपैकी कुणीच मतदान केंद्राकडे फिरकले नाही. इकडे भाजपचे अशोक निंबर्गी, दत्तात्रय गणपा, नरेंद्र काळे यांनी मतपत्रिकांची पडताळणी करतानाच एकूण मते मोजली आणि शासकीय आकडेवारी येण्यापूर्वीच परिचारकांचा विजय ’घोषित’ झाला. त्यानंतर परिचारक जिल्हाधिकारी कार्यालयात आले. त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करुन गुलालाची मुक्तपणे उधळण केली. यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माढयाचे संजय शिंदे, शिवसेनेचे पुरुषोत्तम बरडे, प्रताप चव्हाण यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जल्लोष केला.


 निवडणूक निरीक्षक शिवाजीराव दौड यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रवीण देवरे, निवासी उपजिल्हाधिकारी रमेश चव्हाण, प्रांताधिकारी श्रीमंत पाटोळे, उपजिल्हाधिकारी रवींद्र कुलकर्णी, मारुती बोरकर, नगरपरिषद प्रशासनाधिकारी त्र्यंबक ढेंगळे-पाटील यांनी मतमोजणी प्रक्रियेत भाग घेतला. प्रशांत परिचारक यांच्या विजयामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारवरील विश्‍वास वाढला आहे. शहर-जिल्ह्यातील सर्वच पक्षांच्या मतदारांनी आम्हाला चांगली साथ दिली म्हणून परिचारक यांचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केली.

कार्यकर्त्यांचा जल्लोष...