ठाण्यात गतिमंद तरुणीवर सामूहिक बलात्कार, 5 नराधम अटकेत
12 जानेवारी : ठाण्यात एका 22 वर्षीय गतिमंद तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. लोकमान्य नगर परिसरात हा धक्कादायक प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी 5 नराधमांना अटक करण्यात आलीये.
8 जानेवारीच्या रात्री ही तरुणी खानावळीत जेवण आणायला जाते म्हणून बाहेर पडली. त्याचवेळी तिला तिचा शेजारी गोपी बोरा याने रिक्षातून फिरवून आणतो म्हणून तिला दुसरीकडे नेलं. आपल्या चार साथीदारांच्या बरोबर गोपीने या तरुणीवर रात्रभर अत्याचार केला. रात्री 11 वाजता बाहेर पडलेली मुलगी पहाटे 5:30 वाजता घरी परतली. त्यानंतर या मुलीने घडला प्रकार आईला सांगितला. लगोलग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिल्यानंतर गोपी बोरा, बालाजी खरात, कमलेश गुप्ता, विनयबहादूर गुप्ता आणि राजेश मोर्य या आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींना 16 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.