प्रजासत्ताक दिन 2016 च्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी राष्ट्राला उद्देशून केलेले भाषण

प्रजासत्ताक दिन 2016 च्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी राष्ट्राला उद्देशून केलेले भाषण

नवी दिल्ली,  25   जानेवारी   2016

माझ्या प्रिय देशबांधवांनो,

1.      आपल्या  देशाच्या 67 व्या  प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला, भारतात आणि परदेशात राहणार्‍या तुम्हा सर्वांना मी शुभेच्छा देतो. आपल्या सशस्त्र दलांना, निमलष्करी दलांना आणि अंतर्गत सुरक्षा दलांच्या सदस्यांना मी विशेष शुभेच्छा देतो. भारताची प्रादेशिक अखंडता आणि कायदा सुव्यवस्था कायम राखण्यासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले त्या शूर जवानांना मी आदरांजली अर्पण करतो.

प्रिय देशबांधवानो,

2.     26 जानेवारी 1950 रोजी आपल्या प्रजासत्ताकचा जन्म झाला. या दिवशी आपण भारतीय राज्यघटना स्वत:ला दिली. जगातली सर्वात मोठी लोकशाही स्थापन करण्यासाठी वसाहतवादावर मात करणार्‍या आपल्या असामान्य नेत्यांचा साहसी लढा याच दिवशी संपुष्टात  आला. आपल्याला येथवर घेऊन येणार्‍या राष्ट्रीय एकतेच्या निर्माणासाठी त्यांनी भारताची विस्मयजनक विविधता एका सूत्रात बांधली. त्यांनी स्थापन केलेल्या कायमस्वरुपी लोकशाही संस्थांनी आपल्याला प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर राहण्याची  भेट दिली आहे. आज भारत एक उदयोन्मुख शक्ती आहे, एक असा देश आहे जो विज्ञान, तंत्रज्ञान, अभिनवता आणि स्टार्ट-अप्समधील जागतिक नेतृत्व म्हणून वेगाने उदयाला येत आहे आणि त्याची आर्थिक प्रगती जगाला अचंबित करणारी आहे.

प्रिय देशबांधवानो,

3.     2015 हे वर्ष आव्हानांचे वर्ष होते. या वर्षात जागतिक अर्थव्यवस्थेत मंदीचे वातावरण होते. वस्तू बाजारांवर अनिश्चिततेचे सावट राहिले, संस्थात्मक प्रतिसादांमध्ये अनिश्चितता आली. अशा कठीण परिस्थितीत, कोणत्याही देशासाठी प्रगती करणे सोपे नाही. भारतीय अर्थव्यवस्थेलाही अनेक अडचणींचा सामना करावा लागला. गुंतवणूकदारांच्या सावध पावित्र्यामुळे  भारतासह अन्य उदयोन्मुख बाजारांमधून निधी काढून घेतला जाऊ लागला, आणि त्यामुळे भारतीय रुपयावर दबाव आला. आपल्या निर्यातीवर परिणाम झाला. आपले उत्पादन क्षेत्र अद्याप  यातून पूर्णपणे सावरलेले नाही.

4.     2015 मध्ये आपण निसर्गाच्या कृपेपासून वंचित  राहिलो. भारताच्या बहुतांश भागात भीषण दुष्काळ पडला तर इतर भागाला विनाशकारी पुराचा तडाखा बसला. विचित्र हवामानाचा परिणाम आपल्या कृषी उत्पादनावर झाला. ग्रामीण रोजगार आणि उत्पन्नाची  पातळी यावरही विपरित झाला.

प्रिय देशबांधवानो,

5.     आपण या सर्व घटनांना आव्हाने म्हणू शकतो, कारण आपल्याला ती माहित आहेत. समस्या जाणून  घेणे आणि तिचे निराकरण करणे हा एक श्रेष्ठ गुण आहे. या समस्या सोडवण्यासाठी भारत धोरण आखत आहे आणि त्यांची अंमलबजावणी करत आहे. यावर्षी अंदाजे 7 पूर्णांक  3 दशांश टक्क्यांच्या विकास दरांसह, भारत सर्वात जलद वेगाने वाढणारी विशाल अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे. जागतिक स्तरावर तेलाच्या किंमती घसरल्यामुळे बाहय क्षेत्र स्थिर राखण्यास आणि देशांतर्गत किंमती नियंत्रणात आणण्यास मदत झाली आहे. अधूनमधून पीछेहाट झाली असली तरी औद्योगिक कामगिरी यावर्षी चांगली राहिली आहे.

6.     सध्या 96 कोटी लोकांपर्यंत आधारकार्ड योजना  पोहोचली असून, गळतीचे प्रमाण कमी करत आणि पारदर्शकता वाढवत थेट लाभ हस्तांतरणात मदत करत आहे. प्रधानमंत्री  जनधन योजनेअंतर्गत उघडण्यात आलेली 19 कोटींहून अधिक बँक खाती ही आर्थिक समावेशकतेच्या बाबतीत जगातली एकमेव सर्वात मोठी प्रक्रिया आहे. सांसद आदर्श ग्राम योजनेचा उद्देश आदर्श गावे निर्माण करणे हा आहे. डिजिटल भारत कार्यक्रम हा डिजिटल दरी सांधण्याचा एक प्रयत्न आहे. शेतकर्‍यांचे कल्याण हे प्रधानमंत्री फसल बीमा योजनेचे उद्दिष्ट आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्यासारख्या कार्यक्रमांवर वाढवण्यात आलेल्या खर्चाचा उद्देश  ग्रामीण अर्थव्यवस्थेला पुन्हा सशक्त करण्यासाठी रोजगार निर्मितीत वाढ करणे हा आहे.

7.     मेक-इन-इंडिया अभियानामुळे, व्यवसाय करणे अधिक सुलभ होईल आणि देशांतर्गत उद्योगांची स्पर्धात्मकता वाढून उत्पादन क्षेत्राला चालना मिळेल. स्टार्ट-अप इंडिया कार्यक्रमामुळे  अभिनवतेला चालना मिळेल आणि नवीन युगाच्या उद्यमशीलतेला प्रोत्साहन मिळेल. राष्ट्रीय कौशल्य विकास अभियानामध्ये 2022 वर्षांपर्यंत 30 कोटी युवकांना कुशल बनवण्याचा विचार करण्यात आला आहे.

8.     आपल्या आजूबाजूला संधिसाधू संशय घेणारे आणि त्रास देणारे लोक असू शकतात. आपण तक्रार, मागणी, विरोध करणे सुरु ठेवायला हवे हे देखील लोकशाहीचे एक वैशिष्टय आहे. मात्र आपल्या लोकशाहीने जे मिळवले आहे, त्याची देखील आपण प्रशंसा करायला हवी. पायाभूत विकास, उत्पादन, आरोग्य, शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञानातल्या गुंतवणुकीमुळे, आपण उच्च विकास दर गाठण्याच्या स्थितीत आहोत, ज्यामुळे पुढल्या दहा ते पंधरा वर्षांत गरीबी दूर करण्यात आपल्याला मदत होईल.

प्रिय देशबांधवानो,

9.     भूतकाळाबद्दल आदर हा राष्ट्रभक्तीच्या आवश्यक पैलूंपैकी एक आहे. आपला सर्वोत्कृष्ट वारसा, लोकशाहीच्या संस्था सर्व नागरिकांना न्याय, समानता तसेच लिंग आणि आर्थिक समानता सुनिश्चित करतात. जेव्हा हिंसाचाराच्या निर्दयी घटना, आपल्या राष्ट्रवादाच्या केंद्रस्थानी असलेल्या या स्थापित  मूल्यांवर आघात करतात, तेव्हा त्याच क्षणी त्यांची नोंद घ्यायला हवी. हिंसाचार, असहिष्णुता आणि अविवेकी शक्तींपासून आपण स्वत:चे  रक्षण करायला हवे.

प्रिय देशबांधवानो,

10.  विकासाची शक्ती मजबूत बनवण्यासाठी, सुधारणा आणि पुरोगामी कायद्याची आपल्याला गरज आहे. चर्चा आणि विचार विनिमय करुन असा कायदा लागू करणे हे कायदे-कर्त्यांचे परम कर्तव्य आहे. सामंजस्य, सहकार्य आणि सर्वसहमती बनवण्याची भावना, निर्णय घेण्याची प्रमुख पध्दत असायला हवी. निर्णय आणि अंमलबजावणीतल्या विलंबामुळे  विकास प्रकियेचे नुकसान होईल.

प्रिय देशबांधवानो,

11.  शांतता हा विवेकी जाणीवेचा तसेच आपल्या नैतिक विश्वाचा मुख्य उद्देश  आहे. ती आपल्या संस्कृतीचा पाया आहे आणि आर्थिक प्रगतीची गरज देखील आहे. आणि तरीही  आपण एका साध्या प्रश्नाचे उत्तर अद्याप देऊ शकलेलो नाही. शांतता आपल्या हातून निसटून का जात आहे ? संघर्ष संपवण्यापेक्षा शांतता प्रस्थापित करणे इतके अवघड का जातेय ?

12.  विज्ञान आणि तंत्रज्ञानातल्या उल्लेखनीय क्रांतीने  विसावे  शतक संपत  असतांनाच आपल्याकडे  आशेसाठी काही कारण होते, ते म्हणजे एकविसावे शतक हे असे युग असेल, ज्यात जनतेची आणि देशाची ऊर्जा त्या वाढत्या समृध्दीसाठी समर्पित  असेल, जी प्रथमच हलाखीच्या दारिद्रयाचा अभिशाप मिटवेल. ही आशा या शतकाच्या सुरुवातीच्या पंधरा वर्षात  क्षीण झाली आहे. प्रादेशिक अस्थिरतेमध्ये झालेल्या चिंताजनक  वाढीमुळे बहुतांश भागांमध्ये अभूतपूर्व अशांतता आहे. दहशतवादाच्या तीव्रतेने युध्दाला  रानटी स्वरुपात बदलले आहे. या क्रूर अक्राळविक्राळ राक्षसापासून आता कोणताही कानाकोपरा स्वत:ला सुरक्षित  समजू शकत नाही.

13.  दहशतवाद माथेफिरु उद्देशांनी प्रेरित आहे, त्याला तिरस्काराच्या अगाध सखोलतेचे प्रोत्साहन मिळतेय, आणि निष्पाप लोकांच्या सामूहिक  संहाराच्या माध्यमातून विध्वंस घडवणार्‍या कळसूत्री बाहुल्या त्याला खतपाणी घालत आहेत. हे कोणत्याही तत्वाच्या पलिकडचे युध्द आहे, असा कर्करोग आहे ज्याचा इलाज तिखट सुरीने करावा लागणार आहे. दहशतवाद चांगला किंवा वाईट नसतो, तर फक्त वाईटच असतो.

14. देश प्रत्येक बाबतीत कधीही सहमत होणार नाहीत, मात्र सध्याचे आव्हान हे अस्तित्वाशी निगडीत आहे. मान्यताप्राप्त सीमा ज्या धोरणात्मक स्थैर्याचा पाया आहेत, त्यांनाच नाकारुन हे दहशतवादी सुव्यवस्था ढासळू इच्छित आहेत. जर हे लुटारु सीमा तोडण्यात यशस्वी झाले, तर आपण अराजकतेच्या पर्वांकडे वाटचाल करु लागू. देशांमध्ये वाद होऊ शकतात, आणि जसे की आपण सर्व जाणतो, कि जितके आपण शेजार्‍यांच्या जवळ असू, वादाची शक्यता तितकीच अधिक असेल. संवाद हा असहमती दूर करण्याचा एक सुसंस्कृत मार्ग आहे, जो खरं तर कायम असायला हवा. मात्र आपण गोळयांच्या वर्षावाखाली शांततेबाबत चर्चा करु शकत नाही.

प्रिय देशबांधवानो,

15.  भयानक संकटाच्या काळात, जगासाठी दिशादर्शक बनण्याची ऐतिहासिक संधी आपल्याला आपल्या  उपखंडात मिळाली आहे.  आपण आपल्या शेजार्‍यांबरोबर शांततापूर्ण चर्चेच्या माध्यमातून,  आपल्या भावनिक आणि भौगोलिक-राजकीय वारशाच्या जटिल समस्या सोडवण्याचा प्रयत्न करायला हवा आणि हे ओळखून  परस्परांच्या समृध्दीमध्ये विश्वास दाखवायला हवा. मनुष्याची सर्वोत्तम व्याख्या दुष्प्रवृत्तीने  नव्हे तर मानवी सद्भावनेने  होते. मैत्रीची  आत्यंतिक गरज असलेल्या जगासाठी आपले उदाहरण हाच एक संदेश असू शकतो.

प्रिय देशबांधवानो,

16.  भारतात आपल्याला प्रत्येकाला निकोप, आनंदी आणि यशस्वी जीवन जगण्याचा अधिकार आहे, मात्र या अधिकारांचे विशेषत: आपल्या शहरांमध्ये उल्लंघन केले जात आहे, याठिकाणीे प्रदूषण धोक्याच्या पातळीवर पोहोचले आहे. 2015 हे वर्ष सर्वात उष्ण वर्ष म्हणून  नोंदले गेले, तेव्हा हवामान बदलाचा खरा अर्थ समोर आला. विविध स्तरांवर बहुविध धोरण आणि कृतीची गरज आहे. शहरी  नियोजनासाठी  अभिनव तोडगा, स्वच्छ ऊर्जेचा वापर आणि लोकांची मानसिकता बदलण्यासाठी सर्व हितधारकांचा  सक्रीय सहभाग  आवश्यक आहे जर लोकांनी हे बदल स्वीकारले, तरच हे बदल कायमस्वरुपी राहतील.

प्रिय देशबांधवानो,

17.  आपल्या मातृभूमीविषयी प्रेम हा सर्वांगीण प्रगतीचा पाया आहे. शिक्षणाच्या ज्ञानवर्धक प्रभावामुळे मनुष्याची प्रगती आणि भरभराट  होते. ते भावनात्मक सामर्थ्य विकसित करण्यात मदत  करते, ज्यामुळे हरवलेल्या आशा आणि दुर्लक्षित मूल्य पुन्हा जागृत  होतात.  डॉ. सर्वपल्ली  राधाकृष्णन यांनी म्हटले होते, शिक्षणाचा अंतिम  परिणाम एक मुक्त सर्जनशील मनुष्य असायला हवा, जो ऐतिहासिक परिस्थिती आणि नैसर्गिक संकटांविरुध्द लढू शकेल. चौथी औद्योगिक क्रांती निर्माण करण्यासाठी या मुक्त  आणि सर्जनशील मनुष्याने, व्यवस्था आणि समाजांमध्ये जे बदल  प्रस्थापित  होत आहेत, ते बदल आत्मसात करण्यासाठी परिवर्तन वेगावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. महत्त्वपूर्ण विचारांना चालना देणार्‍या आणि अध्यापनाला बौध्दिकदृष्टया उत्तेजन देणार्‍या वातावरणाची आवश्यकता आहे. यामुळे विद्वत्तेला प्रेरणा मिळायला हवी आणि ज्ञान आणि शिक्षकांप्रती आदर वाढायला हवा. तसेच महिलांप्रती आदराची भावना निर्माण व्हायला हवी, ज्यामुळे ती व्यक्ती आयुष्यभर सामाजिक सदाचाराच्या मार्गावर  चालत राहील. यातून गहन विचारांच्या संस्कृतीला प्रोत्साहन  मिळेल आणि चिंतन आणि आंतरिक शांतीचे-वातावरण निर्माण होईल. मनात जागृत होणार्‍या विविध विचारांप्रती खुला  दृष्टिकोन ठेवून आपल्या शैक्षणिक संस्था जागतिक दर्जाच्या बनायला हव्यात. आंतरराष्ट्रीय  मानांकनामध्ये सर्वोत्तम  दोनशे संस्थांमध्ये दोन भारतीय उच्च शिक्षण संस्थांनी स्थान मिळवून याची सुरुवात केलीच आहे.

प्रिय देशबांधवानो,

18.  पिढयांमध्ये बदल झाला आहे. जबाबदारी स्वीकारण्यासाठी युवक पुढे आले आहेत. नूतन युगेर भोरे या टागोरांच्या शब्दांनी पुढे मार्गक्रमण करुया :

चोलाय चोलाय बाजबे जायेर भेरी

पामेर बेगी पॉथ केटी जाय, कोरिश ने आर देरी ।

पुढे चला, ढोल-ताशांचे सूर तुमच्या विजयी घोडदौडीची घोषणा करत आहेत.

अभिमानाने पाऊल टाकत आपल्या स्वत:चा मार्ग बनवा, उशीर करु नका, एका नव्या युगाचा उदय होत आहे.

धन्यवाद.

जय हिंद !

पीआयबी