पुणे: 15 वर्षीय मुलीचं धाडस, बालविवाहाचा घाट घालणाऱ्या आई-वडिलांची पोलिसात तक्रार

पुणे : पुण्यातील एका अल्पवयीन मुलीने स्वत:चाच बालविवाह रोखण्याचं क्रांतीकारी पाऊल उचललं आहे. 15 वर्षीय मुलीने पोलिसात तक्रार करत आई-वडिलांनी घातलेला बालविवाहाचा या घाट उधळून लावला आहे. पोलिसांनी संबंधित मुलीच्या पालकांना बालविवाहविरोधी कायद्याची समज दिली आणि सोडलं.

पुणे: 15 वर्षीय मुलीचं धाडस, बालविवाहाचा घाट घालणाऱ्या आई-वडिलांची पोलिसात तक्रारमुलीची आई गृहिणी असून वडिलांना दारुचं व्यसन आहे. वडील आईला सतत मारहाण करत असल्याने ही मुलगी वैतागली होती. उच्चशिक्षण घेऊन तिला मोठं व्हायचं होतं. पण अशावेळी पालकांनी तिच्या लग्नाचा बळजबरीने घाट घातला होता. शेवटी नाईलाजाने या तरुणीने पोलिस ठाणं गाठून आपल्या आई-वडिलांविरोधात तक्रार केली.

या मुलीचं लग्न ऑगस्ट 2015 मध्ये ठरलं होतं. मात्र त्याचवेळी तिने लग्नाला विरोध केला होता. परंतु यानंतर आईने धमकी दिली, जबरदस्ती केली, मारहाण केली आणि लग्नाला उभं केलं. सगळ्यांनी तिला समजावलं, पण तिने कोणाचंही ऐकलं नाही. महत्त्वाचं म्हणजे लग्न ठरवल्याचं आई-वडिलांनी पोलिसांकडे अजूनही कबूल केलेलं नाही, असं मुलीने सांगितलं.

संबंधित मुलीच्या आई-वडिलांनी लग्नासाठी मुलाच्या कुटुंबियांकडून पैसे घेतल्याचं कळतं.

महत्त्वाचं म्हणजे या अल्पवयीन मुलीचा ज्या मुलाशी विवाह होणार होता, त्या मुलाशीही तिला बोलू देत नव्हते. मुलीचा विरोध सुरु असल्याने प्रसंगी तिला घराबाहेर आणि कॉलेजमध्ये जाण्यास बंदी घातली. सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरु होता. मात्र आजी-आजोबा आणि मित्रमैत्रिणीच्या पाठिंब्यामुळे पोलिसात जाण्याची हिम्मत दाखवता आली, असंही या धीट मुलीने नमूद केलं.

या प्रकरणात पोलिसांनीही पाठिंबा दिला. आई-वडिलांना पुन्हा त्रास दिला तर तक्रार कर, ते कोठडीत जाऊ शकतात, असा दिलासा पोलिसांनी दिल्याचं मुलीने सांगितलं.

दरम्यान, ही मुलगी पुण्याच्या सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये अकरावीत शिकत आहे. हॉटेल मॅनेजमेन्ट करायचं असल्याचं तिने सांगितलं.

चुकीच्या प्रथेविरोधात थेट आई-वडिलांनाही विरोध करण्याचं धाडस तिनं अवघ्या 15 व्या वर्षी दाखवलं आहे आणि आता तिच्या संगोपनाची सगळी जबाबदारी आजी-आजोबांनी उचलली आहे.