शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांचं निधन
12 डिसेंबर : शेतकरी संघटनेचे संस्थापक नेते आणि माजी खासदार शरद जोशी यांचं आज निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते. पुण्यातील राहत्या घरी आज सकाळी ९ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. शरद जोशी यांच्या निधनामुळं शेतकरी चळवळीचा ‘योधा’ हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


शरद जोशींचे अल्पचरीत्र
३ सप्टेंबर १९३५ रोजी सातारा येथे जन्म झालेल्या शरदरावांचे प्राथमिक शिक्षण बेळगावला झाले तर मुंबईतील सिडनहॅम कॉलेजमधून त्यांनी एमकॉम केले. बँकिंग या विषयासाठी त्यांना सी. रँडी सुवर्णपदकाने गौरवण्यात आले. शरद जोशी यांनी २००४ ते २०१० या कालावधीत राज्यसभेत खासदार म्हणून काम केले.
त्यांचे मूलभूत कार्य शेती व शेतक-यांचे प्रश्न याभोवती फिरत राहिले जे १९७७ पासून अव्याहत सुरू होते. १९७९ मध्ये त्यांनी शेतकरी संघटनेची स्थापना केली आणि तेव्हापासून ’शेतमालास रास्त भाव’ या एककलमी कार्यक्रमासाठी कांदा,उस, तंबाखू, दूध, भात, कापूस, इत्यादी पिकांच्या शेतकरी आंदोलनाचे नेत्वृत्व केले. त्यासाठी वारंवार उपोषणे, तुरुंगवास, मेळावे, प्रशिक्षण शिबिरे, अधिवेशने असे मार्ग त्यांनी निरंतर सुरू ठेवले.
शेतकरी आंदोलन महाराष्ट्रापुरते मर्यादित न ठेवता त्यांनी देशभरातील शेतकर्यांच्या अ-राजकीय संघटनांच्या समन्वय समितीची स्थापना ३१ ऑक्टोंबर १९८२ रोजी केली आणि महाराष्ट्रासह पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, गुजराथ, राजस्थान, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, इत्यादी राज्यात शेतकरी आंदोलने उभारली.
चांदवड (जि.नाशिक) येथे ९-१० नोव्हेंबर १९८६ रोजी अभूतपूर्व शेतकरी महिला अधिवेशन भरवले ज्यामध्ये सुमारे दोन लाख महिला उपस्थित होत्या.
जोशी यांनी स्वतंत्रतावादाचा पुरस्कार करण्यासाठी ’स्वतंत्र भारत पक्षा’ची स्थापना (१९९४) केली. देशाची राजकीय,आर्थिक व सामाजिक यंत्रणा पूर्णपणे बदलून टाकण्याची आवश्यकता सांगताना त्यासाठी उपाययोजना सुचविणारा अनोखा, मतदारांना कोणतीही लालूच न दाखविणारा किंबहुना मतदारांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणारा निवडणूक जाहीरनामा जोशी यांनी मांडला.
शेतकरी संघटनेचे पहिले मुखपत्र साप्ताहिक ’वारकरी’ चे ते संपादक व प्रमुख लेखक होते.
तिसर्या जगातील आर्थिक दुरवस्थेचे अचूक निदान करून त्यावर उपचार सुचविणारा विचार म्हणून शरद जोशींचा विचार व त्याच्या मान्यतेसाठी त्यांनी सुरू केलेल्या शेतकरी चळवळीचा अभ्यास करण्यासाठी, अनेक विदेशी विद्यापीठांतील संशोधकांनी भारतात धाव घेतली. त्यांना शरद जोशींनी मार्गदर्शन केले.
ठळक नोंदी ’इंडिया-भारत’
शरद जोशी यांची ग्रंथसंपदा
१ शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती
२ प्रचलित अर्थव्यवस्थेवर नवा प्रकाश
३ चांदवडची शिदोरी - स्त्रियांचा प्रश्न
४ शेतकर्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख
५ स्वातंत्र्य का नासले?
६ खुल्या व्यवस्थेकडे - खुल्या मनाने
७ अंगारमळा
८ जग बदलणारी पुस्तके
९ अन्वयार्थ - १,२
१० माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो
११ बळीचे राज्य येणार आहे
१२ अर्थ तो सांगतो पुन्हा
१३ पोशिंद्याची लोकशाही
१४ भारतासाठी
१५ राष्ट्रीय कृषिनीती
इंग्रजी ग्रंथसंपदा
1 Answering before God
2 The Women's Question
3 Bharat Eye view
4 Bharat Speaks Out
5 Down To Earth
हिंदी ग्रंथसंपदा
१ समस्याए भारत की
२ स्वतंत्रता क्यों नाकाम हो गई?