सचिन गावस्करच्या तोलामोलाची एकही इनिंग खेळला नाही - इम्रान खान



नवी दिल्ली, दि. १२ - सचिन तेंडुलकर हा महान फलंदाज होता, परंतु सुनील गावस्कर ज्या पद्धतीने खेळला तसा एकही डाव सचिन खेळला नसल्याचं मत इम्रान खानने व्यक्त केले आहे. एका कार्यक्रमात बोलताना इम्रानने जागतिक पातळीवर सर्वोत्कृष्ट फलंदाज सुनील गावस्कर होता असे मत व्यक्त केले आहे.
सुनील गावस्करचे विक्रम त्याचं खरं कर्तृत्व दाखवत नसल्याचं इम्रानने म्हटले असून त्यावेळचे वेस्टइंडिजचे भेदक तेज गोलंदाज बघा आणि कपिल येईपर्यंत भारताकडे चांगला फास्ट बोलरपण नव्हता याचा विचार करा असे सांगितले आहे. 
सनीच्या काळात झहीर अब्बास, माजिद खान, जावेद मियाँदाद हेदेखील चांगले फलंदाज होते असं सांगताना अर्थात त्या काळातल्या फलंदाजांची सचिनबरोबर तुलना करणं योग्य नसल्याची पुष्टीही जोडली आहे. 
इम्रानच्या मते अब्दुल कादीर हा शेन वॉर्न व अनिल कुंबळेपेक्षा काकणभर सरस होता. 
महेंद्र सिंग ढोणीचंही कपिलने वारेमाप कौतुक केलं असून तो खडतर प्रसंगी नक्की कामाला येतो असे कौतुक केले आहे. जावेद मियाँदादशी इम्रानची कटुता असली तरी त्याचं कौतुक करताना शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज देणारा तो लढवय्या होता अशी दाद त्यानं दिली आहे.