नाशिकमधील गोल्डन गँग गजाआड, 5 किलो बनावट सोनं जप्त
नाशिक : अल्प दरात सोन देण्याच्या बहाण्याने लोकांना लुटणाऱ्या 3 जणांच्या आंतरराज्यीय टोळीला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीकडून 5 किलो बनावट सोनं जप्त करण्यात आलं आहे. नाशिक उपनगर पोलिसांनी ही कारवाई केली.
जमीन खोदताना सापडलेले जुने सोने 5 लाख रुपये किलोने द्यायचे आहे, असे सांगून ही टोळी सावज हेरायची. 25-30 लाखांचा माल 5 लाखात मिळतोय म्हटल्यावर लालचेने लोक फसायचे. सुरुवातीला व्यवहार ठरवताना खऱ्या सोन्याचे 2 मणी दाखवले जायचे आणि प्रत्यक्षात मात्र खोटं सोनं दिलं जायचं. या टोळीने अशा पद्धतीने अनेकांना फसवलं.
अखेर नाशिकच्या एका व्यक्तीने उपनगर पोलिसांना माहिती दिल्यावर पोलिसांनी या टोळीवर पाळत ठेवली. ब्राह्मणवाडे गावात 5 किलो बनावट सोने विकताना या टोळीला रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. या टोळीचे अजून अनेक गुन्हे उघडकीस येतील आणि अजुन काही साथीदार असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे
