15 दुकानांवर अतिक्रमणाची कारवाई पंढरपुरात मोहीम
- पंढरपूर : येथील व्यापार्यांनी अतिक्रमण करुन थाटलेली 15 दुकाने नगरपालिका प्रशासनाने सतर्कतेची भूमिका घेत सोमवारी काढली आहेत. ही मोहीम राबविण्यात येत असल्याने व्यापारी धास्तावले आहेत.
शहरातील अंबाबाई पटांगणाच्या समोरील रस्त्याच्या कडेला कुडरूवाडी, बार्शी, सोलापूर आदी ठिकाणी जाणार्या बस, चारचाकी गाड्यांचा थांबा आहे. यामुळे या ठिकाणी पंढरपुरातील नागरिक बसच्या प्रतिक्षेत थांबतात तसेच विठ्ठल मंदिर व चंद्रभागा नदी जवळ असल्याने बसने येणारे जादा भाविक त्याच ठिकाणी उतरतात. यामुळे त्या परिसरात भाविकांची व नागरिकांची गर्दी होते. त्यामुळे वाहनेही जादा प्रमाणात होतात. यामुळे या ठिकाणी अनेक अपघातही झाले आहेत.
अंबाबाई पटांगणाच्या दर्शनी बाजूला हॉटेल व्यावसायिकांनी अतिक्रमण केले होते. यामुळे मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी पुन्हा सोमवारी सकाळी 11 च्या सुमारास या परिसरातील अतिक्रमण काढले. यावेळी अतिक्रमण निरीक्षक दत्तात्रय वटकर, कुमार भोपळे उपस्थित होते तसेच या कारवाईसाठी 2 जेसीबी, 1 टेंपो, 1 ट्रॅक्टर, 15 कर्मचारी अशी यंत्रणा वापरण्यात आली असल्याची माहिती अतिक्रमण निरीक्षक दत्तात्रय वटकर यांनी सांगितली़