पुण्यातील पिंपरी चिंचवड व मावळमधील दोन बड्या घराण्यांच्या शाही विवाहात जावयांसाठी ऑडी, फॉर्च्यूनर चा नजराणा....! लग्नाला हजर असलेल्या प्रत्येक पाहुण्याला सोन्याची अंगठी.... ओवाळणी करणार्‍या अत्याबाईंना एक्टिव्हा गाडी.... भावकीतल्या जावईबापुंना 12 बुलेटस्.... महाराष्ट्र दुष्काळाच्या गडद सावटाखाली असताना पैशांची भरमसाठ उधळपट्टी....

पंढरपूर लाईव्ह/महाराष्ट्र लाईव्ह न्युज (प्रतिनिधी) दि. 22 डिसेंबर 2015
पुणे 22 डिसेंबर : खरं तर महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती पहाता सर्वांनीच विवाहसोहळ्यासाठी पैशाचा बाजार न मांडता साध्या पध्दतीने अथवा अनाठाई खर्च टाळणे आवश्यक बनले असताना  पिंपरी-चिंचवडमध्ये तर उधळपट्टीची सीमाच ओलांंडण्यात आली आहे. होणार्‍या जावाईबापूंसाठी चक्क ऑडी, फॉर्च्युनर आणि 12 बुलेट्सचा नजराणा दिलाय. इतकंच नाही तर ओवाळणी करणार्‍या आत्यासाठी ऍक्टिव्हा आणि लग्नाला पाहुण्यांसाठी सोन्याच्या अंगठ्या देण्यात आल्या.

चिंचवड आणि मावळमधल्या दोन बड्या घराण्यांमध्ये शाही विवाह पार पडला. यात जावयांचा अनोखा मानसन्मान करण्यात आला. नव्या जावयाला ऑडी देण्यात आली. तर दुसर्‍या जावयाला फॉर्च्युनर देण्यात आली. भावकीतल्या इतर जावयांसाठी 12 बुलेट देण्यात आल्या. या नव्या कोर्‍या गाड्या लग्नमंडपात लावण्यात आल्या होत्या. लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांचाही तोलामोलात मानसन्मान करून त्यांना खूश करण्यात आलं.

विवाह म्हणजे दोन जीवांचं मिलन... असा अर्थ आता नामशेष होत चाललेला असून आत्ता मात्र ‘‘विवाह म्हणजे आपला डामडौल दाखविण्यासाठीचा सोहळा’’ अशी व्याख्या रुढ होताना आढळत आहे. महाराष्ट्रावर दुष्काळाची गडद छाया असताना पुण्यातील वरील विवाह सोहळ्यात पैशाची अशी लयलुट झाल्याबद्दल च्या बातम्या व त्यावरील वेगवेगळ्या प्रकारच्या पोष्ट आज सोशल नेटवर्कवर वेगात फिरताना दिसत असून सर्वत्र या शाही विवाहाचीच चर्चा रंगलेली आहे.