संत नामदेवांच्या पालखीचे आळंदीकडे प्रस्थान
पंढरपूर लाईव्ह/महाराष्ट्र लाईव्ह न्युज
दि.26 नोव्हेंबर 2015
प्रतिनिधी, पंढरपूर
चला आळंदीला जाऊ। ज्ञानदेवा डोळा पाहू॥
कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त अलंकापुरी आळंदी येथे कार्तिक कृष्ण 13 बुधवार 9 डिसेंबर रोजी भरत असलेल्या संजीवन समाधी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पंढरीतून संत नामदेव महाराजांच्या पालखीने चांदीचा रथ, दिंडी लवाजम्यासह कार्तिक शुध्द पौर्णिमा बुधवार दि. 25 नोव्हेंबर रोजी आळंदीच्या दिशेने प्रस्थान ठेवले.
प्रारंभी कार्तिकी यात्रेनिमित्त पौर्णिमे दिवशी श्री विठ्ठल-रुक्मिणीची भेट घेतल्यानंतर गोपाळकाल्याचा सोहळा साजरा करण्यासाठी पालखी गोपाळपूर येथे गेले. ह.भ.प. नामदास महाराजांचे काल्याचे कीर्तन होऊन भाविकांना काल्याचे वाटप करण्यात आले. टाळ-मृदूंगाच्या निनादात हरिनामाचा गजर करीत पालखी सोहळा पुन्हा प्रदक्षिणा मार्गावरील नामदेव मंदिरात आला.

संत नामदेवांच्या पालखी सोहळ्यासमवेत आळंदीला जाण्यासाठी सकाळपासूनच इतर पालख्या, दिंड्या, मंदिरात येत होत्या. भजन झाल्यानंतर श्री केशवराज व संत नामदेव महाराजांची आरती करण्यात आली. ह.भ.प. महेश महाराज कवठेकर यांच्या हस्ते पादुका पालखीत ठेवण्यात आल्या. त्यानंतर बडवे, उत्पात, नामदास, हरिदास, डकरी, मठकरी, वारकरी संघटनांचे पदाधिकारी, सेवेकरी, मानकरी यांना मानाचे श्रीफळ देण्यात आले. त्यानंतर येे ग ये ग विठाबाई। माझे पंढरीचे आई । हा संत जनाबाईचा अभंग झाल्यानंतर पालखी सोहळा महाद्वार येथे संत नामदेव पायरीजवळ आला. तेथे अभंग व आरती करण्यात आली.
‘ज्ञानोबा-तुकाराम, नामदेव-जनाबाई’ असा जयघोष करीत, हरिनामाच्या गजरात व टाळ-मृदूंगाच्या निनादात खांद्यावर भागवत धर्माची पताका व डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, सर्वात पुढे घोडेस्वार अशा शाही थाटात हा पालखी सोहळा निघाला. विसावा मंदिर इसबावी येथे अभंग व आरती झाल्यानंतर पालखी सोहळ्यातील वारकर्यांनी आळंदीच्या दिशेने प्रस्थान करून पंढरी नगरीचा निरोप
घेतला.
याप्रसंगी वारकरी, फडकरी, दिंडी समाज संघटनांचे पदाधिकारी, नामदास महाराज परिवार, शिंपी समाज बांधव व भाविक बहुसंख्येने उपस्थित होते. सर्वश्री ह.भ.प. केशव महाराज, कृष्णदास महाराज, माधव महाराज, मुकुंद महाराज, ज्ञानेश्वर महाराज नामदास यांच्या मार्गदर्शनाखाली हा पालखी सोहळा साजरा होत आहे. यासाठी सोपान, एकनाथ, विठ्ठल, केदार, निवृत्ती, श्रीहरी आदी युवक महाराज व सेवक मंडळी परिश्रम घेत आहेत. वाडीकुरोली, माळशिरस, साधुबवा मंदिर, ङ्गलटण, सुरवडी, वाल्हे, सासवड, पुणे आदी ठिकाणी मुक्काम करत हा पालखी सोहळा गुरुवार 3 डिसेंबर रोजी आळंदी येथे पोहणार असून श्री विष्णू मंदिर येथे पालखीचा मुक्काम राहणार आहे.